'राजकन्येची बाहुली' : एक दृष्टीक्षेप
महाराजा श्रीवल्लभ एक शक्तीशाली सम्राट.
त्याची एकुलती एक मुलगी प्रभावती एक आईविना पोरकी राजकन्या आहे. तिचं सारं भावविश्व तिच्या लाडक्या बाहुलीभोवती गुंफलेले आहे.
राजा श्रीवल्लभाचा शत्रू राजा विक्रम! श्रीवल्लभाकडून वेळोवेळी युद्धात हरल्यामुळे विक्रम राजा राजकन्या प्रभावतीला पळवून ठार करण्याचा कट रचतो आणि त्याचे दोन मारेकरी प्रभावतीला पकडण्यासाठी सोडतो. ही बातमी ऐकून चिंताक्रांत झालेला श्रीवल्लभ आपल्या प्रधानाला आणि सेनापतीला राजकन्येला शूर आणि विद्वान बनवण्याचा हुकूम देतो.
परंतु आपल्या बाहुलीशी खेळण्यात रममाण झालेली राजकन्या काहीही शिकण्यास नकार देते.
ना राजकारण!
ना लढाई!
ना संगीत!
ना इतिहास!
त्यावर श्रीवल्लभ ती बाहुली घनदाट जंगलात फेकून देण्याचा हुकूम देतो. बाहुलीसाठी वेडी झालेली राजकन्या राजवाड्यातून पळून जाते आणि जंगलात जाऊन बाहुली शोधून काढते.
ही बातमी कळालेले विक्रम राजाचे मारेकरी तिचा माग काढत जंगलात पोहोचतात.
घाबरलेली राजकन्या जंगलात सैरावैरा पळत सुटते.
जंगलात धोंड्या, पांड्या आणि रुपा ही तीन निडर आदिवासी भावंडे राजकन्येला भेटतात आणि तिच्याशी मैत्री करतात.
त्यांच्यामुळे ती आपल्या कोषातून बाहेर पडते आणि तीही धीट बनते. राजकन्या रूपाला आपला मुकुट आणि दागदागिने भेट म्हणून देते. रूपा आता जणू राजकन्याच भासू लागते.
इतक्यात मारेकरी पोचतात आणि राजकन्या समजून रुपालाच पकडतात.
प्रत्यक्ष मारेकरी समोर आल्यावर ही सर्व मुले मिळून त्यांना तोंड देतात.
परंतु त्यांची मात्रा चालत नाही. मारेकरी आपला डाव साधणार इतक्यात राजा श्रीवल्लभ आपल्या सेनेसह तेथे पोहोचतो आणि मारेकर्यांना अटक करतो.
राजा श्रीवल्लभ धोंड्या, पांड्या आणि रुपाला दत्तक घेऊन धोंड्याला राजा बनवण्याचा मनसुबा जाहीर करतो. पण धोंड्या त्याला नकार देतो. राजकन्याही राजाला सांगते, "मी मुलगी असले तरी शूर आहे. ही फेकून दिली मी बाहुली. आता मी सर्वांना दाखवून देईन की मी तुमच्यापेक्षाही शूर आणि हुशार आहे."
या बालनाट्यात अगदी पाच वर्षे वयापासून १३ वर्षे वयापर्यंतच्या लहानग्यांनी भाग घेतला. मुळात मराठी अस्खलितपणे न बोलू शकणारी ही मुले जेंव्हा रंगमंचावर आपल्या भूमिका साकारत होती तेंव्हा अगदी कसलेल्या कलाकारांचा आभास होत होता. या बालनाट्यात कोठेही कुजबुज्या (प्रॉम्प्टर) ची गरज लागली नाही.
स्त्रीशिक्षणाच्या ढोबळ विषयाबरोबरच 'कर्तव्यासाठी आपल्या आवडत्या गोष्टींचा त्याग करावा लागतो' हा सूक्ष्म संदेशही या बालनाट्याच्या माध्यमातून मुलांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न झाला. लेखक श्री. विजय शिंदे यांचे कसब असे की निखळ विनोदी आणि करमणूकप्रधान अशा या बालनाट्यात लपलेला संदेश देण्यासाठी कोठेही त्यांनी बटबटीत, प्रचारकी थाटाचे, लहान मुलांच्या तोंडी न शोभणारे संवाद वापरले नाहीत.
या बालनाट्याचे दिग्दर्शन श्री. विजय नाईक यांनी केले. शिबिराचे संकल्पक श्री. प्रकाश फडणीस यांचेही या कामी मोलाचे सहकार्य लाभले. शिबिर समन्वयक सौ. अर्चना फडके यांनी सर्व कलाकारांची काळजी घेतली. नेपथ्य आणि कपडेपट सौ. सुवर्णा नाईक यांनी तर पार्श्वसंगीत श्री. माधव चौसाळकर यांनी सांभाळले. विषेश म्हणजे सर्व बालकलाकारांनी शिबिरात या सर्व तांत्रिक बाबी समजावून घेऊन त्यात सहभागही घेतला होता.
या कार्यक्रमात रंगधारेचे अध्यक्ष, हैदराबाद युनिव्हर्सिटीचे माजी नाट्यशास्त्र विभाग प्रमुख आणि ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. भास्कर शेवाळकर यांच्या हस्ते बालनाट्य शिबिरात सहभागी झालेल्या बालकलाकारांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन रंगधारेचे कार्यवाह श्री. अनंत कुलकर्णी यांनी केले.
या कार्यक्रमास प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. अंदाजे तीनशे बैठकक्षमतेचे हे छोटेखानी नाट्यगृह पूर्ण भरले होते.
लोकाग्रहास्तव याच बालनाट्यांचे प्रयोग लवकरच करण्याचे रंगधारेने ठरवले आहे.
रंगधारा , द थिएटर स्ट्रीम, हैदराबाद निर्मित
बालनाट्य
राजकन्येची बाहुली
लेखन : श्री. विजय शिंदे
दिग्दर्शन : श्री. विजय नाईक
समन्वय : सौ. अर्चना फडके
संकल्पना : श्री. प्रकाश फडणीस
नेपथ्य आणि वेशभूषा : सौ. सुवर्णा नाईक आणि सौ.अर्चना फडके
प्रकाशयोजना : श्री. भास्कर शेवाळकर
संगीत : श्री. माधव चौसाळकर
विशेष साहाय्य : श्री. अनंत कुलकर्णी
भूमिका आणि कलावंत
(प्रवेशानुसार)
प्रधानजी : चि. यश फडके
सेनापती : चि. आदित्य परळीकर
राजरक्षक : कु. सुगंधा जोशी
राजा श्रीवल्लभ : चि. चैतन्य ठाकुर
चरणसिंग : कु. पर्णवी फडके
राजकन्या प्रभावती : कु. ऐश्वर्या गोखले
गायन शिक्षिका : कु. अक्षदा अवधुत
इतिहास शिक्षिका : कु. संपदा जोशी
पहिला मारेकरी: चि. निखिल नाईक
दुसरा मारेकरी: चि. ऋषभ सोमण
धोंड्या : चि. यश फडके
पांड्या : चि. सोहम चौसाळकर
रुपा: कु. ईशा फडके
No comments:
Post a Comment